"सआदत हसन मनटो" याविषयी माझा लेख
अभिषेक विलास काळे.
दि.18-01-2026
पुण्यतिथी निमित्त लेख लिहिला होता.
सआदत हसन मनटो त्यांच्याबद्दल बोलताना अनेकदा सज्जन समाज नाक मुरडतो. ते तर दारुडे होते त्याची संगत चांगली नव्हती.ते नको त्या विषयावर लिहायचे असे आरोप त्यांच्यावर आजही होतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या समाजाने मंटो यांना बदनाम केले तो समाज स्वतः किती स्वच्छ होता?
मंटो यांच्या व्यसनापेक्षा त्यांच्या विचारांची धार जास्त होती, जी आजही पचवणे कठीण आहे.
मनटो हे दारू प्यायचे हे सत्य आहे. पण त्या दारूच्या नशेत ही त्यांना समाजातल्या त्या विदारक जखमा दिसत होत्या ज्या सामान्य डोळ्यांना दिसत नव्हत्या.
विचार करा एक समाज असा की तो आतून सडलेला आणि मनटो आहेत जे व्यसनाच्या गर्देत असूनही माणुसकीच्या कथा लिहित होते. मनटो यांची दारू हा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा भाग होता. पण त्यांच्या लेखणीने समाजाच्या जखमावर जे औषध लावले त्याचा हिशोब कोण देणार?
मनटोंच्या मते दारू पिऊन सत्य बोलणारा माणूस हा त्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे जे शुद्धीवर असूनही खोटेपणाचे आणि देशाचे राजकारण करतात. आजही आपण त्या माणसाच्या विचारांपेक्षा त्यांच्या व्यक्तिगत दोषावर जास्त चर्चा करतो. माझ्या मते मनटोंच्या हातातील दारूची बॉटल पाहण्यापेक्षा त्यांच्या हातातील लेखणीने दिलेले धक्के आपण अनुभवले पाहिजे.
मनटो वाईट होते की चांगले होते,हा मुद्दाच नाही.... महत्त्वाचे हे आहे की त्यांनी जे लिहिले ते सत्य होते की नाही.
जर त्यांचे साहित्य आजही आपल्याला अस्वस्थ करत असेल तर याचा अर्थ मनटो हे जिंकले आहेत आणि आपला दिखावा हरला आहे. दारूच्या नशेतला तो माणूस समाजाच्या डोळ्यातील धुंदी उतरवण्यासाठी पुरेसा ठरला आहे.
मनटो यांनी आपल्या कथांमधून वेश्या ,मजूर, रस्त्यावरील माणसांना स्थान दिले..... ज्यांना आपण नीच मानून दुर्लक्षित करतो. त्यांच्यातील माणुसकी मनटो यांनी जगाला दाखवली आहे. माणूस हा जन्माने नाही तर त्याच्या कर्माने आणि परिस्थितीतून घडतो हा विचार त्यांनी मांडला आहे.
त्यांनी समाजाला प्रश्न विचारला की जर तुम्ही या माणसांना माणूस म्हणायला तयार नसाल तर तुम्हाला स्वतःला सभ्य म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे. याप्रमाणे अनेक विद्रोही व सर्वांना टोचणारे प्रश्न त्यांनी विचारले. सध्याच्या मीडियावर देखील मनटो यांचे विचार काट्यासारखे टोचणारे आहेत ते म्हणतात की जर पत्रकार आपले कलम विकायला लागला तर तो कोठ्यावरील बसणाऱ्या वेश्या पेक्षाही जास्त गेलेला व घातक आहे.कारण वेश्या फक्त स्वतःचे शरीर विकते. पण पत्रकार संपूर्ण देशाचे भविष्य आणि समाजाचा समाजाचा विश्वास विकतो.
माणूस मेल्यावर काय होतो हे मला माहीत नाही पण जिवंतपणे तो हिंदू किंवा मुसलमान होण्याआधी माणूस असायला हवा याप्रमाणे कठोर आणि सत्य विचार त्यांनी समाजाला सांगितले. त्यामुळे आजही मनटो हे खोटारड्यांना व भ्रष्टाचारांना टोचतो.